नौपाडा पोलीसांनी केल्या २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त

नौपाडा पोलीसांनी २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी ही माहिती दिली. महापालिका कार्यालयासमोर असलेल्या साई पॉईंटमध्ये क्रेडीट मॅनेजर या पदावर काम करणा-या जयप्रकाश तिवारी यांनी त्यांच्या वित्तीय कंपनीत रिकव्हरी कलेक्शनचं काम करणा-या दीपकसिंग रावत यांना थकीत कर्जाची वाहनं घेऊन येण्याचं काम दिलं होतं. भिवंडीच्या गोदामामध्ये ही वाहनं जमा करून त्याची माहिती कंपनीस कळवण्यास सांगितलं होतं. दीपकसिंग रावत आणि एजंट अजगर खान यांनी थकीत कर्ज असलेली वाहनं ग्राहकांकडून ताब्यात घेऊन कंपनीला कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्याची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या दुचाकींची रक्कम कंपनीमध्ये भरण्याची आवश्यकता असताना त्यांनी या रकमेचा अपाहार केला. त्या विक्री केलेल्या ग्राहकांनी कागदपत्रं न मिळाल्यामुळं साई पॉईंटशी संपर्क साधला त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी दीपक रावत, अजगर खान अशा दोघांना अटक केली. त्यांच्याकडून परस्पर विक्री केलेल्या सव्वा सहा लाखांच्या १७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या. दुस-या घटनेमध्ये वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी नौपाडा पोलीसांनी विशेष तपास करून कोणताही माहिती नसताना शैलेश शहाला गुजरातमधून अटक केली. शैलेश शहा हा सराईत दुचाकी चोर असून यापूर्वी त्यानं ठाणे शहर, नवी मुंबई परिसरात दुचाकी चोरी केली आहे. त्याच्याकडून नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २, बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, उल्हासनगरमधून १, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ अशा २ लाख ६० हजारांच्या ५ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. थकीत वाहनांची परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात आणखी दुचाक्या मिळण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली असून ग्राहकांनी जुनी वाहनं घेताना शक्यतो संबंधित एजन्सीकडून घ्यावी असं आवाहन पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading