ठाणे महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ठाणे महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनानं हातमिळवणी करून संविधानिक मूल्य पायदळी तुडवली असल्यामुळं ठाणे महापालिका बरखास्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीवरून झालेल्या वादाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही मागणी केली. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर उपमहापौर रमाकांत मढवी यांनी चुकीच्या पध्दतीनं सदस्य निवड केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या संख्याबळानुसार म्हणजे शिवसेनेचे ८, राष्ट्रवादीचे ५, भारतीय जनता पक्षाचे ३ सदस्य निवडले जाणार होते. पण या आदेशाला तिलांजली देण्यात आली. राष्ट्रवादीने ५ सदस्यांची नावं दिलेली असतानाही बंद लखोट्यातील नावं घोषित करण्याऐवजी उपमहापौरांनी भलतीच नावं जाहीर केली. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्यानं त्यांचं पद रद्द करावं अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबतही सत्ताधा-यांनी असाच प्रकार केला होता. उपमहापौरांनी घेतलेल्या निर्णयावर सचिवांनी शरणागती पत्करत शिक्कामोर्तब केलं. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत मात्र निकाल येण्यासाठी लागणा-या कालावधीत अनेक मोठ्या निविदा सत्ताधारी पक्ष चर्चेशिवाय मंजूर करून घेतील. येणा-या निवडणुकांसाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशानं सत्ताधारी स्थायी समितीला केवळ पैसे कमावण्याची, एक खिडकी योजना समजत आहेत. त्यामुळं महापालिका आयुक्तांनी महापालिका बरखास्त करण्याची राज्य सरकारला शिफारस करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान पुढील पराभवाच्या भीतीपोटी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बरखास्तीची मागणी केल्याचा आरोप उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केला आहे. स्थायी समितीमधून जेवढे सदस्य निवृत्त होतात तेवढ्याच सदस्यांची नव्यानं नियुक्ती केली जाते. शिवसेना आणि मित्रपक्षाचे ९ सदस्य स्थायी समितीमध्ये होते तेवढेच सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत असं उपमहापौर रमाकांत मढवी यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading