चेना बंदर येथील एका घरात वन्य प्राण्याचे मांस आढळल्यानं खळबळ

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजिकच्या चेना बंदर येथील एका घरात वन्य प्राण्याचे मांस आढळल्यानं खळबळ उडाली आहे. वन विभागानं या ठिकाणी धाड टाकली असता रानडुक्कराचे मांस आणि शिकारीसाठी उपयुक्त ठरणारी काही शस्त्रास्त्रं हस्तगत करण्यात आली आहेत. मात्र या घराचा मालक योगेश जाधव फरार झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या चेना गावात हरणाचं मांस मिळत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागानं चेना गावातील योगेश जाधवच्या घरी छापा टाकला. या छाप्याच्या वेळी वन अधिका-यांना २ एअरगन, १ गावठी ठासणीची बंदूक आणि २ किलो मांस सापडलं. घरमालक जाधव मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. वन विभागानं जप्त केलेलं मांस चाचणीअंती रानडुक्कराचं असल्याचं स्पष्ट झालं. रानडुक्कराची हत्या ही वन्यजीव हत्या गुन्ह्यात येत असल्यानं वन विभागानं रानडुक्कराचं मांस जप्त केले असल्याचं वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितलं. वन्य प्राण्यांच्या हत्येमागे एखादी टोळी आहे का याचा तपास वन विभाग करत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading