TMC

१५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयानं काम करण्याच्या सूचना देतानाच १५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे ३१ मे पर्यंत नालेसफाई आणि रस्त्याच्या दुरूस्तीची कामं पूर्ण करण्याचे आदेश देताना कोणत्याही परिस्थितीत जिवितहानी होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय शासकीय संस्थांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. शहरातील प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणं, धोकादायक इमारतींची यादी करून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवणं, नालेसफाईची कामं ३१ मे पर्यंत करण्याचे आदेश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. पावसाळ्यात महावितरण, पालिकेचा विद्युत विभाग यांनी संयुक्तपणे काम करताना ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल तिथे पर्यायी व्यवस्था करावी तसंच ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणं नाहीत ती त्वरीत बसवली जावीत. आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचवावं, नागरिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करावी, आरोग्य विभागानं पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी रूग्णालयात आवश्यक तो औषधांचा साठा करावा, अग्निशमन दलानं सतर्क राहण्याबरोबरच वाहतूक पोलीस विभाग, महानगर गॅस, महावितरण, रेल्वे तसंच जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपापसांमध्ये समन्वय साधून आपत्तीचा सामना करण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी या बैठकीत केले.

Comment here