MNSpolitical

शेतक-यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा

शेतक-यांच्या प्रती शासनाची अनास्था, शेतक-यांचं दु:ख आणि सरकारची बेफिकीरी चव्हाट्यावर आणण्याबरोबरच दुष्काळात होरपळणा-या आणि शेवटी मृत्यूला कवटाळणा-या शेतक-याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा नेला जाणार आहे. आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही माहिती दिली. या मोर्चात जवळपास ५ हजार शेतकरी सहभागी होतील असा दावा जाधव यांनी केला. हा मोर्चा गावदेवी मैदानातून महापालिकेवर नेला जाणार आहे. यापूर्वी काढलेल्या मोर्चाची जिल्हाधिका-यांनी दखलही घेतली नाही. त्यांनी या मागण्यांसाठी चर्चेलाही बोलावलं नाही त्यामुळं हा मोर्चा महापालिकेवर नेला जाणार असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. आंबा विक्री केंद्रावरून वाद झाल्यानंतर महापालिकेनं त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र पुन्हा ही परवानगी रद्द करण्यात आली. यामागे भारतीय जनता पक्षाची एक नगरसेविका असून जिच्या मॅटर्निटी होमच्या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला म्हणून फक्त हा विरोध करण्यात आल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. आंबा विक्री करणा-या शेतक-याकडे २० हजार रूपयांचा हप्ताही मागण्यात आला होता. हा आंबा विक्रेता याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार करणार असून त्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही जाधव यांनी यावेळी केली. आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनासाठी महापालिका क्षेत्रात १०० स्टॉल्स महापालिकेनं उपलब्ध करून द्यावेत. संबंधित शेतक-याकडे २० हजार रूपये हफ्ता मागणा-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्याही अविनाश जाधव यांनी यावेळी केल्या.

Comment here