वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठ पुराव्याला यश आले असून पहिला आणि दुसरा टप्पा मिळून एकूण २५ कोटी निधी महापालिकेकडे जमा झाला आहे. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्य शासनाने लता मंगेशकर विद्यापिठाची स्थापना केली. विद्यापिठाची स्थापना केल्यानंतर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये संगित विद्यालय चालू करण्यासाठी अनेक कलावंत प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी करीत होते. त्यानुसार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २५ कोटीची मान्यता देऊन वर्तकनगर येथील रेप्टाकोस कंपनीच्या सुविधा भुखंडावर भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया चालू असून येत्या महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्यामुळे संगीत विद्यालयाचे बांधकाम दिड वर्षामध्ये पुर्ण होईल अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली. संगीत विद्यालयाच्या कामास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून हे काम महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आता या कामाला प्रशासकिय व तांत्रिक मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया चालू असल्यामुळे ह्या कामाला येत्या महिनाभरात प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
ठाणे शहरामध्ये अनेक कलावंत राहत असल्यामुळे ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लता मंगेशकर संगीत विद्यालय निर्माण करून ते राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करावे म्हणजे त्याचा फायदा ठाणे शहरातील उद्योन्मुख गायकांना होईल. या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून रितसर संगीत अभ्यासक्रम शिकविल्यास नवे संगीतकार निर्माण होतील. या संगीत विद्यालयातून संगीत विद्येचा अभ्यासक्रम सुरु करून ते मुंबईत प्रस्तावित असलेल्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करून ठाणे शहराच्या संगीत विद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांना मान्यवर संगीत तंज्ञाकडून संगीताचे धडे दिले जाणार असून अधिकृत संगीत विषयाची पदवी प्राप्त होणार आहे. यातून नवे गायक, गायिका, कलाकार घडतील. यासाठी असे ठाणे शहरामध्ये संगीत विद्यालय होणे खूप गरजेचे होते असे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. राज्य शासनाने कलाकारांसाठी ठिकठिकाणी संगीत विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर असे संगीत विद्यालय सुरू करणारे ठाणे महापालिका ही पहिली संस्था आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे लवकरच संगीत विद्यालयाच्या बांधकामाचे भुमिपुजन करून कामाला सुरूवात होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading