crime

रसायन भरून निघालेल्या टँकरमधील १५ लाखांच्या रसायनाचा अपहार करून चालक पसार

रसायन भरून निघालेल्या टँकरमधील १५ लाखांच्या रसायनाचा अपहार करून पसार झालेल्या टँकर चालकाचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत. त्रिभुवन पाठक असं टँकर चालकाचं नाव असून त्याच्या आधारकार्डावर पंजाबचा पत्ता तर वाहन परवान्यावर उत्तरप्रदेश जौनपूरचा पत्ता असल्यानं पोलीसही चक्रावले आहेत. कोलशेत येथे राहणारे वाहतूकदार सुजित झा यांच्या मालकीचा टँकर २८ मे रोजी ब्रह्मांड येथील इण्डोफील कंपनीतून म्हैसूर येथील एशियन पेंटस् कंपनीकरिता रसायनं घेऊन निघाला होता. त्रिभुवन पाठक चालवत असलेला हा टँकर २ जून रोजी म्हैसूर येथे पोहचला. या टँकरला जीपीएस सुविधा असल्यामुळं मालक झा यांना टँकरची इत्तंभूत माहिती वेळोवेळी मिळत होती. एशियन पेंटस् कंपनीमध्ये संप सुरू असल्याचं सांगून टँकर रिकामा करण्यास उशीर लागणार असल्याचा निरोप पाठक यानं झा यांना पाठवला. दुस-या दिवशी टँकर रिकामा करण्यापूर्वी दिलेल्या सँपलमध्ये भेसळ आढळल्यानं एशियन कंपनीनं टँकरमधील रसायन नाकारले. तेव्हा झा यांनी पुन्हा दुसरे सँपल देण्यास पाठकला सांगितले. त्यावेळी पाठक तिथून गायब झाला. त्यानंतर झा यांनी दुस-या चालकाला पाठवून सँपल दिले असता टँकरमध्ये रसायनाऐवजी पाणी असल्याचं आढळलं. तेव्हा झा यांनी चालक त्रिभुवन पाठक विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Comment here