Rain

पूर्व मौसमी पावसाची जिल्ह्यात जोरदार हजेरी

पूर्व मौसमी पावसानं ठाणे जिल्ह्यात काल रात्री जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडाटात आणि वीजांच्या चमचमाटात जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं लावलेल्या जोरदार हजेरीमुळे लाही लाही करणा-या तीव्र उष्म्यात ठाणेकरांना सुखद गारवा अनुभवता आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. ठाण्यामध्ये काल रात्री सव्वा नऊ वाजता सुरू झालेला पाऊस साधारणत: साडेदहाच्या सुमारास थांबला. ढगांचा जोरदार कडकडाट आणि वीजांच्या चमचमाटात पाऊस कोसळत होता. ठाण्यामध्ये जवळपास दीड तासात ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं तर अनेक ठिकाणी झाडं कोसळून पडली. पहिल्याच पावसानं बहुतांश ठाणेकरांना अंधारात ढकललं होतं. पाऊस सुरू झाल्यापासून गायब झालेली वीज पाऊस थांबल्यानंतरच परतली. पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाल्याचं दिसून आलं. मात्र काहीसा त्रास होऊनही या पावसामुळं तीव्र उष्म्यापासून सुटका झाली. पहिल्याच पावसात तापत्या मातीमधून सुंदर मृदगंध निर्माण झाला होता. या पहिल्याच पावसामुळं विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर उपनगरीय सेवाही विस्कळीत झाली होती. या पहिल्या पावसाचा आनंद बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनीही लुटला. आज दुस-या दिवशीही दुपारनंतर पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. सकाळपासून दुपारपर्यंत अंगाला चटका देणारं कडक ऊन होतं मात्र दुपारी अडीचच्या सुमारास ढगाळ वातावरण झाल्यानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली होती.

Comment here