businessSocial

ठाण्यात सोलापूर फेस्टीवलचं आयोजन

आपण परदेशात जातो, तीन चार दिवस झाले की भाकरीची ओढ लागते. पण तिकडे भाकरी मिळत नाही. मात्र सोलापूरची कडक भाकरी तीन महिने टिकते त्यामुळं ही कडक भाकरी, शेंगा चटणी आणि त्यासोबतच सोलापूर फेस्ट सातासमुद्रापार जाईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सोलापूर फौंडेशन आयोजित सोलापूर फेस्टीवलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. उद्यापर्यंत चालणा-या या सोलापूर महोत्सवात दीडशे उत्पादनांसह उद्योजक सहभागी झाले आहेत. शेंगा चटणी, कडक भाकरी, लांबोटीचा चिवडा, हुग्गी या चटकदार खाद्यपदार्थांसह सोलापूरची चादर, सतरंजी, हातमागावरील साड्या अशा वस्तूंची एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी ठाणेकरांना मिळाली आहे. सोलापूरातील प्रत्येक उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी सोलापूर सोशल फौंडेशनचे प्रमुख सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिर, सिध्देश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, भगवंत मंदिर, तुळजाभवानी मंदिर या मंदिरांच्या प्रतिकृती हुबेहूब उभारण्यात आल्या आहेत. सामुहिक अग्निहोत्र, प्रवचन, भारूड आदी अध्यात्मिक कार्यक्रम सुरू असून केसर आंबा, डाळिंब, बेदाणा आदी जिल्ह्यातील दर्जेदार फळांचे स्टॉलही या प्रदर्शनात पहायला मिळतात. दुष्काळी झळा सोसणा-या शेतक-याला या फेस्टीवलच्या माध्यमातून दिलासा मिळणार असल्यानं या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं आहे.

Comment here