TMC

ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसात बुजवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातून जाणारे रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे न तपासता त्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. पुढील ३ दिवसात शहरातील सर्व रस्त्यांवर बांधकाम विभागाकडून तात्काळ खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. गेले काही दिवस सतत पडणा-या संततधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची विशेष बैठक घेऊन येत्या तीन दिवसात युध्द पातळीवर हे खड्डे भरण्यात यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सतत कोसळणा-या पावसामुळं सिमेंटने किंवा डांबरचा वापर करून खड्डा भरणे अवघड असल्यानं पाऊस सुरू असताना कोल्ड मिक्स्चरचा वापर करून खड्डे भरण्यात येणार आहेत. तसंच रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्यासाठी जेट पॅचर तसंच शक्य तिथे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून खड्डे भरण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

Comment here