Dharmrajya PakshpoliticalThane Station

ठाणे रेल्वे स्थानकातील २० प्रवेश मार्ग बेकायदेशीर ठरवून बंद करण्यास धर्मराज्य पक्षाचा विरोध

ठाणे रेल्वे स्थानकातील २० मार्ग बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील २७ पैकी २० प्रवेश मार्ग बेकायदेशीर असल्याच्या नावाखाली बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मात्र हा निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याची संतप्त प्रतिक्रिया धर्मराज्य पक्षानं व्यक्त केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी असलेल्या २७ मार्गामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या विभागली जाऊन स्थानकातली गर्दी कमी होण्यास मदत होते. असं असताना निव्वळ बेकायदेशीर असल्याच्या नावाखाली त्यातील २० मार्ग बंद करण्याऐवजी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नेमून प्रवाशांची प्रवेश बंदी टाळावी आणि गर्दीच्या वेळी सुटसुटीतपणा येण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. मूळात २ हजार मध्ये कळवा-तुर्भे असा रेल्वे मार्ग प्रस्तावित असताना तो ठाणे-वाशी असा केल्यामुळेच ठाणे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त ताण आला असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकात सुरक्षिततेच्या दृष्टीनं इतर कोणतीही अत्याधुनिक पर्यायी यंत्रणा असताना २० मार्ग बंद करण्याचा निर्णय न पटणारा असल्याचं मत देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांची कोंडी होऊन चेंगराचेंगरीसारखी धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते याकडे देशपांडे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळात रेल्वे प्रवाशांचा लोंढा पूर्व आणि पश्चिमेकडे वळत असतो. त्यातच सॅटीस सारख्या प्रकल्पामुळे आणि रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे ठाणे स्थानकाबाहेरील गर्दीत आणखी भर पडत असते. असं असताना २७ पैकी २० मार्ग बंद करून रेल्वे प्रशासन आणखी असुरक्षितता निर्माण करत असल्याचा आरोप नितीन देशपांडे यांनी केला आहे.

Comment here