ठाणे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करून घेण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करून घ्या अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सिनेवंडर मॉल च्या शेजारी असलेली ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशामक दल अपयशी ठरल्याने खासदार राजन विचारे यांनी महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट आणि मॉक ड्रिल करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचे अग्निशमन दल प्रयत्न करीत होते. परंतु आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अपुरा रस्ता असल्यामुळे आग विझवण्यात त्यांना यश येत नव्हते. अग्निशमन दलाच्या ब्रँट्रो गाड्या असल्याने या गाड्यांसाठी एकावेळी तीन पाण्याच्या टँकरची आवश्यकता असते. परंतु अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ते शक्य होत नव्हते. ठाणे हे तलावांचे शहर असताना अशावेळी तलावाचे पाणी कसे वापरात आणता येईल हेही अधिकाऱ्यांना सुचले नाही. ठाणे शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने जात असताना अपुऱ्या यंत्रसामुग्री आणि नियोजन अभावी तसेच इमारतींना परवाना देतेवेळी अग्निशामक दलाने फायर ऑडिट न करता शहर विकास विभाग परवाना कसा देऊ शकते यावर राजन विचारे यांनी संशय व्यक्त केला आहे. ही आग विझविण्यासाठी अखेर मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या पाच महापालिकांची आणि एअर फोर्सची मदत घ्यावी लागली. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागलेली छोटीसी आग विजविण्यास 11 तास लागले त्यामुळे हा वणवा पेटतच गेला. पाचव्या आणि चौथ्या मजल्यावर 23 कार्यालय, तीन कार आणि 23 दुचाकी आगीमध्ये जाळून खाक होऊन लाखोचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे 200 ते 250 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. वागळे इस्टेट भागात सर्वात जुनी औद्योगिक वसाहत आहे. या भागात आयटी पार्क आहेत. हजारो कामगार या ठिकाणी कामानिमित्ताने येत असतात. व्यवसायिकांची कोट्यवधीची उलाढाल येथे होत असते. अशाप्रकारची आग या भागात लागल्यास आपण किती तत्पर आहात ? घोडबंदर रस्ता हा तुलनेने अरुंद आहे. या ठिकाणी आग विझविण्यास नाकी नऊ आले. तर अशा गर्दीच्या, लोकवस्तीच्या ठिकाणी आग कशी आटोक्यात आणाल? असा सवाल विचारे यांनी केला. तसेच शहरात टोलेजंगी इमारती बांधण्यास परवानग्या दिल्या जात आहेत. या इमारतींना अग्निशमन दलाच्या परवानग्या असतात का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी तुम्ही ठोस उपाययोजना राबवावी, अन्यथा एखादा अपघात घडल्यास हे सरकार, प्रशासन जबाबदार असेल असे खासदार राजन विचारे यांनी ठणकावून सांगितले. तसेच ५० मजली इमारतींनाही परवानगी दिल्याचे समजले आहे. आपण ठाणे महानगरपालिका हद्दीत किती इमारतींच फायर ऑडीट आत्ता पर्यंत केले आहे याची माहिती तसेच ठाणे शहरात असलेले व्यापारी संकुल, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, तसेच दाट लोकवस्ती असलेल्या इमारतींचे फायर ऑडीट आणि मॉक ड्रिल करून घेण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading