MNSpolitical

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी १०० गाळे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

शासनाबद्दल शेतक-यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता १०० गाळे मिळावेत या आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज ठाण्यामध्ये जोरदार मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केलं. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये पदपथावर उभारलेल्या आंबा विक्री केंद्रावरून झालेल्या वादानंतर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सुरूवातीस हा मोर्चा महापालिका कार्यालयावर नेला जाणार होता. मात्र नंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. गावदेवी मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा राम मारूती रस्ता, तलावपाळी, कोर्टनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिका-यांना यावेळी मोर्चातील शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं एक निवेदन दिलं. आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी महापालिका क्षेत्रात १०० स्टॉल्स महापालिकेनं उपलब्ध करून द्यावेत. संबंधित शेतक-याकडे २० हजार रूपये हफ्ता मागणा-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह इतर काही नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comment here