political shivsena

दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश

दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे. प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या तुटपुंज्या नुकसान भरपाईच्या विरोधात श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन तसेच लोकसभेतही हा विषय वारंवार मांडल्यानंतर अखेरीस प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याची तयारी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनने दाखवली आहे. राज्यभरातील ३२०० प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरला आहे. १६ डिसेंबर २०१५ रोजी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी लोकसभेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश मिळाले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले  होते. या बैठकीत त्यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. दोन वेगवेगळ्या कायद्यान्वये प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येत असल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत असंतुलन असून ही रक्कम देखील तुटपुंजी आहे. अधिकृत घर असलेल्या घरमालकाला देखील इतकी तुटपुंजी रक्कम देऊ करण्यात येत आहे की, त्या रकमेत आज झोपडे देखील मिळणार नाही असे खासदार शिंदे यांनी निदर्शनास आणून देऊन नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी केली.

त्यावर डीएफसीसीचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याची डीएफसीसीची तयारी आहे. राज्यात एकूण ३२०० प्रकल्पबाधित असून यासंदर्भात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. घराच्या बदल्यात घर मिळाल्यामुळे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्याही तक्रारी निकालात निघणार असून प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *