political shivsena

ठाणे आणि मुलुंड दरम्यान नविन विस्तारीत स्थानकाचं काम पुढील वर्षी होणार सुरू – पालकमंत्री

ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नविन विस्तारीत स्थानकाच्या कामाची सुरूवात पुढल्या वर्षी जानेवारीमध्ये होईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी केली. काल एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. विस्तारीत ठाणे स्थानक, कोपरी पूलाचं विस्तारीकरण आणि ठाणे पूर्वकडील सॅटीस दोन प्रकल्प या सर्वांचा तिढा सुटल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. खासदार प्रकाश परांजपे यांनी मनोरूग्णालयाजवळ नविन स्थानक उभारण्याची कल्पना काही वर्षांपूर्वी मांडली होती. सुरूवातीला त्यांच्या या कल्पनेवर टीकाही झाली होती. मात्र आता ही कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. विस्तारीत रेल्वे स्थानक आणि इतर बाबींकरिता मनोरूग्णालयाची १४ एकर जागा देण्यास आरोग्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली आहे. या बदल्यात मनोरूग्णालयाला महापालिका विकास हस्तांतरण हक्क देण्यास तयार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. कोपरी पूलाबाबतच्या अडचणीही सोडवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. सध्या असलेल्या पूलाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी २ मार्गिका मुंबई महानगर विकास प्राधिकरण उभारणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर जुना पूल पाडून त्याजागी नविन पूल बांधण्याबाबत रेल्वेनंही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्षात घडल्यास ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *