जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून गोवर आणि रूबेला लस देण्याचं नियोजन पूर्ण

गोवर आणि रूबेला लसीकरणाबाबत कोणताही संशय बाळगू नये, आत्तापर्यंत २८ राज्यात या मोहिमेत साडेतीन कोटीहून अधिक मुलामुलींना ही लस देण्यात आल्याचं सांगून जिल्हाधिका-यांनी जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून ही लस देण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं सांगितलं. ही लस मोफत असून कोणत्याही शाळेनं कुठलंही शुल्क यासाठी आकारू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबर पासून करण्यात येणार असून ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील २६ लाखाहून अधिक मुला-मुलींना ही लस दिली जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही या योजनेत सामावून घेऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असं ते म्हणाले. यापूर्वी लसीकरण झालेले असले आणि काही आजार असला तरी देखील ही अतिरिक्त लस टोचून घ्यायची आहे. हे इंजेक्शन अतिशय सुरक्षित असून ते उजव्या खांद्यावर वरच्या बाजूस देण्यात येणार आहे. ही लस प्रशिक्षित आरोग्य सेवक देणार आहेत. प्रत्येक शाळेसाठी प्रशिक्षित सेवकांची पथकं तयार करण्यात आली आहेत. लस दिल्यानंतर ३० मिनिटं निरिक्षणासाठी ठेवलं जाणार आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. विनायक जळगावकर यांनी सांगितलं. ठाणे पालिका क्षेत्रात ६ लाख ८ हजार, भिवंडी पालिका क्षेत्रात २ लाख १६ हजार, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात ३ लाख ५१ हजार, मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात २ लाख ८१ हजार, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ६ लाख ८ हजार, ग्रामीण भागात ६ लाख ९३ हजार अशा २६ लाखाहून अधिक मुलामुलींना ही लस दिली जाणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading